दिल्लीत ३१ जुलैपर्यंत रुग्णांची संख्या ५ लाखांच्या वर जाण्याची शक्यता: उपमुख्यमंत्री सिसोदिया
कोरोना रुग्णांच्या उपचारावरुन राजकारण?
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वात डीडीएमएची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. बैठकीत मनीष सिसोदिया म्हणाले की, जर रुग्णांची वाढ अशीच सुरु राहिली तर 31 जुलैपर्यंत पाच लाखाहून अधिक कोरोना रुग्ण दिल्लीत वाढतील.
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, 'दिल्लीतील रुग्णालये सर्व रूग्णांसाठी उघडण्याबाबतचा मुद्दा आम्ही बैठकीत उचलला. दिल्ली सरकारचा निर्णय का बदलण्यात आला याबाबत विचारलं असता उपराज्यपालांना यांचं उत्तर देता नाही आलं.'
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, 'एलजीच्या निर्णयामुळे दिल्लीकरांसमोर संकट उभे राहिले आहे. ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, असे दिसते आहे की 30 जून पर्यंत 15 हजार बेडची आवश्यकता लागेल. 31 जुलै पर्यंत 80 हजार बेड्स लागतील. 31 जुलै पर्यंत 5 लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होऊ शकते.'
आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि ते रोखण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे नेते या बैठकीस उपस्थित राहू शकतात.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रूग्णालयात केवळ दिल्लीकरांच्या उपचाराचा आदेश फक्त २४ तासांत उपराज्यपालांनी बदलला. उपराज्यपालांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर वीटो दाखल केले.
आता दिल्लीतील रुग्णालयात इतर राज्यातील लोकांवर देखील उपचार केले जाणार आहेत. इकडे उपराज्यपालांनी निर्णय बदलल्याने दिल्ली सरकार नाराज आहे. सीएम केजरीवाल यांनी त्वरित ट्विट केले की दिल्लीकरांसाठी ही नवीन समस्या आहे.
सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, 'एलजी साहेबांच्या आदेशाने दिल्लीतील लोकांसाठी मोठी समस्या आणि आव्हान निर्माण केले आहे. कोरोना साथीच्या वेळी उपचार देणे हे देशभरातून आलेल्या लोकांसाठी एक मोठे आव्हान आहे. कदाचित आपण संपूर्ण देशाच्या लोकांची सेवा करावी अशी देवाची इच्छा आहे. आम्ही प्रत्येकाच्या उपचारांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू.
आम आदमी पक्षाचा हा राग भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्विट करुन आणखी वाढवला आहे. गंभीर यांनी ट्विट केले की, 'इतर राज्यातील रूग्णांवर उपचार न करण्याच्या दिल्ली सरकारच्या मूर्खपणाच्या आदेशाचा अंत करण्यासाठी एलजीचा उत्कृष्ट निर्णय. भारत एक आहे आणि आपल्याला या साथीने एकत्रितपणे लढावे लागेल! इंडिया फाइट अगेन्स्ट कोरोना.'