भारतात आतापर्यंत १० लाखाहून अधिक जणांची कोरोनावर मात
भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी एक चांगली बातमी दिली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, आतापर्यंत देशातील १० लाखाहूनही अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थ कामामुळे आणि समर्पणामुळे ही गोष्ट होऊ शकली आहे.
ते म्हणाले की, कोरोना रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात सकारात्मक बदल दिसत आहे. एप्रिलमध्ये तो 7.85% होता, जो आज वाढून 64.4% झाला आहे. ते म्हणाले की देशात अशी 16 राज्ये आहेत जेथे रिकव्हरी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये दिल्ली सर्वात वर आहे. येथे रिकव्हरी रेट ८८ टक्के आहे. त्यानंतर लडाखमध्ये 80, हरियाणा- 78, आसाम 76, तेलंगणा 74, गुजरात 73, राजस्थान 70, मध्य प्रदेश 69 तर गोव्यात 69 टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, आज भारतात मृत्यूचे प्रमाण २.२१% आहे आणि हे जगात सर्वात कमी आहे. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देशापेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी आहे.