मुंबई : नव्या वर्षात डेबिट कार्डने खरेदी करणे स्वस्त होणार आहे. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे ही खरेदी एक हजाराहून अधिक असली पाहिजे. तर एक हजाराहून कमी खरेदी डेबिट कार्डवरुन करणे महाग होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेबिट कार्डवरुन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रिझर्व्ह बँकेने मर्चंट डिस्काऊंट रेट(एमडीआर) ही नवी पद्धत सुरु केलीये. आतापर्यंत खरेदीच्या रकमेवरुन त्यावरील चार्ज ठरत होता. मात्र दुकानदार टर्नओव्हरच्या हिशोबाने हा चार्ज स्वीकारतील.


लहान दुकानदारांकडून बँक प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २०० रुपये आणि मोठ्या दुकानदारांकडून १०००हून अधिक चार्ज घेऊ शकणार नाही. कार्ड पेमेंटच्या बदल्यात बँक दुकानदारांकडून चार्ज आकारत होती. यालाच एमडीआर म्हणतात. दुकानदार हा चार्ज ग्राहकांकडून वसूल करतात. रिझर्व्ह बँकेचे हे आदेश एक जानेवारीपासून लागू होणार.


देना बँकेचे सीएमडी अश्विनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे दुकानदारांची कॉस्ट कमी होईल. त्यामुळे आशा आहे की दुकानदार डिजीटल ट्रान्झॅक्शनकडे वळतील. 


का घेण्यात आला निर्णय?


मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूनंतर मीडियाशी बोलताना रिझव्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर यांनी सांगितले, २०१६-१७ मध्ये पॉईंट ऑफ सेल(पीओएस) टर्मिनलवर डेबिट कार्डचा वापर २१.९ टक्के इतका होता. हे प्रमाण वाढत नाहीये. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलाय.


५००० रुपयांच्या खरेदीवर २० रुपये चार्ज


दरवर्षी २० लाखापर्यंतच्या टर्नओव्हर असलेल्या व्यवसायातून बँक ट्रान्झॅक्शनच्या किंमतीच्या ०.४० टक्क्याहून अधिक एमडीआर घेऊ शकणार नाही. म्हणजेच ५००० रुपयांच्या खरेदीवर २० रुपये इतका चार्ज लागू होईल. 


ज्या दुकानदारांचा टर्नओव्हर २० लाखाहून अधिक आहे त्यांना चार्ज लिमिट ०.९० टक्के इतकी ठेवण्यात आलीये. येथे ५ हजार रुपयांच्या खरेदीवर ४५ रुपये चार्ज पडतील.