Mosquito bite : जागतिक आर्थिक मंदीचं संकट सध्या फोफावताना दिसत असून, अनेकांनाच या संकटामुळं फटका बसताना दिसत आहे. कैक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट आलेली असतानाच जिथं एकिकडे देशापुढे हे आर्थिक संकट मोठं होत आहे तिथं दुसरीकडे लहानसा मच्छरही देशाच्या संकटात भर टाकताना दिसत आहे. कारण, मच्छर चावल्यामुळं होणाऱ्या झोपमोडीचे थेट परिणाम निम्म्याहून अधिक भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर होताना दिसत आहे. गुडनाइटने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून यासंदर्भातील माहिती आणि आकडेवारी समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मच्छर चावल्यामुळं ओढावणारं हे संकट पश्चिम भारतावर सर्वाधिक शेकत असून, त्यामागोमाग दक्षिण, उत्तर आणि पूर्व भाग येतोय. आकडेवारीनुसार दर दोनपैकी एका प्रौढ व्यक्तीच्या (50 टक्के) अनुषंगानं डासांमुळे झोपेत वारंवार व्यत्यय येत असून, एप्रिल महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिल्यास अर्ध्याहून अधिक म्हणजेच 58 टक्के भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर मच्छर चावून होणाऱ्या झोपमोडीमुळे परिणाम होत आहे. 


झोपेत आलेल्या सततच्या व्यत्ययामुळं येणारा थकवा हे त्यामागचं प्रमुख कारण ठरत आहे. सदर सर्व्हेक्षणामध्ये 53 टक्के महिला आणि 62 टक्के पुरुषांना मच्छर चावल्यामुळं झोपेत व्यत्यय येत असून, त्यांच्या उत्पादनक्षमतेवर थेट परिणाम होताना दिसत आहे. स्पर्धात्मक युगात भारताच्या प्रगतीच्या दृष्टीनं ही अतिशय धोक्याची बाब ठरत आहे. 


भारतात दरवर्षी साधारण 40 दशलक्षांहून जास्त नागरिकांना डासांमुळे मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचा सामना करावा लागतो. अनेकांना या आजारपणामुळे शाळा, सामाजिक उपक्रम, कामांपासून अगदी व्यावसायिक बांधिलकीपर्यंतच्या उपक्रमांतून रजा घ्यावी लागते. आजारपणामुळं आरोग्यसेवांवरचा खर्च वाढतो आणि भार वाढून या साऱ्याचा एकूणच परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो.   


हेसुद्धा पाहा : हिऱ्यांची शेती, शोधून सापडणारे मोती; 800 वर्षांपूर्वी असा होता भारत


भौगोलिक रचनेनुसार पश्चिम भागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मच्छर चावल्यामुळं घटणाऱ्या उत्पादनक्षमतेचं प्रमाण अधिक असून, इथं एकूण 67  टक्के नागरिकांना डासांमुळे त्रास होत आहे. यामध्ये 57 टक्क्यांसह दक्षिण भारत दुसऱ्या स्थानावर असून, त्यामागे तिसऱ्या स्थानावर त्यानंतर उत्तर भारतातील चंदीगढ, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. भारताच्या पूर्वेकडे हे प्रमाण 49 टक्के इतकं आहे.