Mothers Day 2019 : `होय माझ्या मुलाला ६० % गुण मिळाले, मला त्याचा अभिमान आहे`
या #Supermomची सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
मुंबई : अमुक एका परीक्षेत मुलाला चांगले मार्क मिळावेत. त्यातही परीक्षा बोर्डाची असेल तर पालकांची त्यांच्या मुलांप्रती असणारी अपेक्षा जास्त असते. अपेक्षांचं हेच ओझं घेऊन अनेक मुलं अभ्यास करतात. पण, त्यातील सर्वांनाच यश मिळतं असं नाही. मुलांच्या वाट्याला आलेलं यश हे नेहमीच महत्त्वाचं असतं आणि ते साजरा केलं गेलंच पाहिजे याच एका भावनेने करण्यात आलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये वंदना सुफिया कटोच यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. सर्वत्र मातृदिनाचा उत्साह असतानाच वंदना यांची ही पोस्ट खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरत आहे.
कटोच यांनी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला ६० टक्के मिळाल्याचं सांगितलं. 'दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवणाऱ्या माझ्या मुलाचा मला प्रचंड अभिमान वाटत आहे. हो... त्याला ९० टक्के मिळालेले नाहीत पण, तरीही माझी त्याच्याप्रतीची भावना मात्र या एका कारणामुळे बदललेली नाही', असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाने कशा प्रकारे हे यश संपादन केलं याविषयी लिहिलं आहे. काही विषय अवघड वाटत असतानाही त्याने शेवटच्या एक- दीड महिन्यात त्याने तयारी केली आणि यश संपादन केलं, असं कटोच यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं. त्यांनी लिहिलेली ही पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली. अनेकांनीच ती शेअर केली, तर कोणी कमेंट बॉक्समध्ये वंदना यांच्या या पोस्टचं कौतुक केलं.
आपल्या मुलाने केलेला संघर्ष पाहून त्याच्या प्रयत्नांना दाद देत पुढच्या वाटचालीसाठीच कटोच यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. शिवाय येत्या काळात तुझ्यात इतर गोष्टींप्रती असणारं कुतूहल आणि इतर गोष्टी या कायम ठेव असं सांगत एक आई म्हणून त्या आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. यंदाच्या वर्षी सीबीएसईच्या परीक्षेत जवळपास १३ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले, अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. सर्वत्र या जास्त गुण मिळणाऱ्या मुलांचं कौतुकही केलं गेलं. अगदी माध्यमांनीही त्यांची पाठ थोपटली. याच सर्व वातावरणात ६० टक्के गुण मिलवून उत्तीर्ण होणारा आपला मुलगाती तितकाच असून त्याचं हे यशही प्रशंसनीय आहे, हीच बाब या सुरेख अशा पोस्टमधून त्यांनी मांडली. काय मग आहेत की नाही, त्या #Supermom?