Crime News : जमिनीच्या वादातून (land dispute) अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचे आपण वाचलं असेल. पण मध्य प्रदेशात (MP News) जमिनीच्या वादातून सहा जणांचा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून हा रक्तरंजित खेळ झाल्याचे समोर आले आहे. जमिनीसाठी वाद, शत्रुत्व, तडजोड, फसवणूक आणि शेवटी सूड असा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातल्या मुरैनामध्ये पाहायला मिळाला आहे. दोन कुटंबांच्या वादात सहा जणांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नऊ वर्षापूर्वी दोन कुटुंबांमध्ये रक्तरंजित संघर्ष घडला होता आणि त्यात दोन जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबे समोर आली आणि सहा जणांना जीव गमवावा लागला. शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील मुरैना येथील लेपा गावात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार वाद झाला. सुरुवातीला लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाल्यानंतर हे प्रकरण गोळीबारापर्यंत गेले. गोळी लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हत्याकांडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समोर उभ्या असलेल्याम लोकांवर रायफलने गोळीबार करत असल्याचे दिसत आहे.


नेमकं काय झालं?


धीर सिंह आणि गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबात झालेल्या वादातून सहा जणांचा बळी गेला आहे. 2013 मध्ये गजेंद्र सिंह आणि धीर सिंह यांच्या कुटुंबीयांमध्ये वैर सुरू झाले होते. जमिनीच्या तुकड्यावर कचरा टाकण्यावरून दोन कुटुंबात वाद झाला होत. हा वाद इतल्या टोकाला गेला की गजेंद्र सिंगच्या माणसांनी धीर सिंगच्या कुटुंबातील दोन जणांची हत्या केली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. त्यानंतर गजेंद्र सिंहचे कुटुंब गाव सोडून दुसरीकडे राहायला गेले. इथे धीर सिंहचे कुटुंब सूड घेण्याच्या भावनेने आगीत धुमसत होते.


कोर्टात प्रकरण लांबल्यानंतर समाजातील लोकांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतला आणि गजेंद्र सिंहच्या कुटुंबाला गावात येऊन राहण्याची परवानगी देण्यात आले. कोर्ट, पोलीस आणि गावकरी यांच्या साक्षीने हा करार करण्यात आला होता. त्यामुळे गजेंद्र सिंहचे कुटुंबिय आनंदात होते. मात्र दुसरीकडे चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या धीर सिंहच्या कुटुंबियांच्या मनात दुसरंच काही चाललं होतं. धीर सिंहचे कुटुंब गजेंद्रच्या कुटुंबाची गावात येण्याची वाट पाहत होते. 


असा घेतला बदला...


शुक्रवारी सकाळी गजेंद्र सिंहचे कुटुंबिय गावात परतताच धीर सिंहच्या कुटुंबियांना त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला लाठी हल्ला केल्यानंतर धीर सिंहच्या कुटुंबीयांनी रायफल काढल्या आणि गोळीबार सुरू केला. गजेंद्र सिंहच्या कुटुंबियांतील जे कोणी दिसत होते त्याला धीर सिंहचे कुटुंबिय ठार करत होते. धीर सिंहच्या लोकांनी महिलांनाही सोडले नाही आणि गावात रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसू लागले.


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे.