नवी दिल्ली : १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो खासदारांच्या शपथविधीचा. पुढली पाच वर्षं संसदेत कसं चित्र दिसणार आहे, याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसली. नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या शपथविधीवेळी गोंधळ झाला. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी हिंदीमध्ये खासदारकीची शपथ घेतली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठीतून, शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठीमधून शपथ घेतली.अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा यांनीही मराठीतूनच शपथ घेणं पसंत केले. तर अहमदनगरमधून निवडणूक आलेले खासदार सुजय विखे पाटील यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.


आणि गोंधळ झाला...


भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या शपथविधीवेळी गोंधळ झाला. त्यांनी शपथ घेताना स्वतःच्या नावाआधी आपले गुरू स्वामी पूर्ण चेतनानंद अवधेशानंद गिरी यांचेही नाव घेतले. विरोधकांनी यावर आक्षेप घेत जोरदार गोंधळ घातला. हे संसदेच्या प्रथेला धरून नसल्याचा विरोधकांचा दावा होता. या गोंधळातच साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपली शपथ पूर्ण केली.


सत्ताधारी बाकांवरून जोरदार गोंगाट


केरळच्या वायनाडमधून लोकसभेत गेलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उशिरा संसदेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी खासदारकीची शपथही घेतली. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून जोरदार गोंगाट करण्यात आला. इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर ते रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करायला विसरले. त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेच्या कर्मचाऱ्यांनी परत बोलावलं आणि स्वाक्षरी करायची आठवण करून दिली. गांधींचं नाव पुकारलं जाताच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींसह काँग्रेस सदस्यांनी बाक वाजवले. 


टाळ्यांचा कडकडाट झाला


अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव करून प्रथमच लोकसभेत आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या सर्व खासदारांमध्ये इराणींसाठी सर्वाधिक काळ टाळ्या वाजत होत्या. शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारलं जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवायला सुरूवात केली. शपथ घेऊन झाल्यानंतर बराच काळ टाळ्यांचा कडकडाट झाला.