देहरादून : बहुप्रतिक्षित अशी चारधाम यात्रा कोरोना व्हायरचं सावट असतानाही सुरु करण्याचा निर्णय़ उत्तराखंड सरकारकडून घेण्यात आला आहे. एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जुलैपासून ही यात्रा सुरु करण्यात येणार आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसाठीचे प्रतिबंधात्मक उपायही योजण्यात येण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. पण, यंदाच्या वर्षी मात्र भाविकांच्या येण्यावरही बरेच निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत कंटेन्मेंट झोन, क्वारंटाईन सेंटर आणि इतर राज्यांतील कोणाही व्यक्तीला यात्रेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही आहे. उत्तराखंड चारधाम देवस्थानम बोर्डाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याबातची माहिती देण्यात आली.


राज्यातीलच भाविकांना चारधाम यात्रेसाठी प्रवेश दिला जात असताना त्यांनाही जिल्हास्तरीय प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर भाविक ही यात्रा करु शकणार आहेत. आतापर्यंत या यात्रा मार्गाशी जोडल्या गेलेल्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोलीमध्ये स्थानिकांना यात्रेसाठीची परवानगी देण्यात आली.



भाविकांची संख्या निर्धारित


यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेदरम्यान भाविकांना अगदी निर्धारित संख्येत प्रवेश दिला जाणार आहे. बद्रीनाथमध्ये १२००, केदारनाथमध्ये ८००, गंगोत्रीमध्ये ६००, यमुनोत्रीमध्ये ४०० भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.