भाजपची महत्त्वाची बैठक, PM मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिले हे निर्देश
PM Modi Meeting with CM`s: पंतप्रधान मोदींनी रविवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घ भेट घेतली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच अनुषंगाने भाजपने रविवारी मुख्यमंत्री परिषदेची मोठी बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही बैठक सुमारे पाच तास चालली. बैठकीत, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना कल्याणकारी योजनांना प्रसार आणि राज्यात व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले वातारवण बनवण्यास सांगितले.
18 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक
भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीत 18 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. भाजपने एका निवेदनात म्हटले आहे की, बैठकीत पंतप्रधान मोदींनी सरकारच्या काही प्रमुख योजना आणि गति शक्ती, हर घर जल, स्वामित्व, थेट लाभ हस्तांतरण (DBT) सारख्या उपक्रमांच्या चांगल्या अंमलबजावणीवर भर दिला.
"पंतप्रधान मोदींनी सर्व प्रमुख योजनांचे जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर दिला आणि भाजपशासित राज्यांनी या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे सांगितले." व्यवसायात सुलभता सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देताना मोदींनी घेतलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख केला. पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांनी खेळांना योग्य महत्त्व दिले पाहिजे आणि मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग आणि सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यास सांगितले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सुशासन कक्षाचे प्रमुख विनय सहस्रबुद्धेही या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, 18 राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व केंद्र पुरस्कृत कल्याणकारी योजना आणि प्रमुख कार्यक्रमांचे 100 टक्के लक्ष्य साध्य करण्यावर चर्चा केली. या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर किंवा इतर पक्षांसोबत युती करून सत्तेत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या बैठकीत उपस्थित होते. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि बिहारमधील तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्यासह अनेक उपमुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.