गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!
Delisle Bridge Reopen: बाप्पाच्या आगमनाआधीच डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे.
Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.
24 जुलै 2018 मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल बंद करण्यात आला होता. हा पूल बंद असल्यामुळं वाहतूक कोंडी होऊन वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता हा पूल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी या पुलाचा एक टप्पा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अखेर गणेश चतुर्थीच्या आधीच हा पूल खुला होण्याची शक्यता आहे.
डिलाइल पुलाचा एक टप्पा जी. के मार्ग आणि एम एम जोशी मार्गाला जोडतो. पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला होता. लोअर परेलला करी रोडशी जोणारा पुलाचा दुसरा टप्पा येत्या गणेशोत्सवापूर्वी सुरू होऊ शकतो.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी डांबरीकरणाची कामे सुरू झाले आहेत. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पुलाच्या दुसऱ्या भागावर काँक्रिटीकरण आणि डक्टिंगची कामे पूर्ण करण्यासाठी आणि ऑक्टोबरच्या अखेरीस पूर्ण पूल खुला करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुल खुला करण्याची अंतिम मुदत मे 2022 होती मात्र आतापर्यंत ती तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
डिलाइल पुल खुला झाल्यानंतर डॉ. भीमराव आंबेडकर रोड, करी रोड आणि भायखळा ते चिंचपोकळीहून येणाऱ्या वाहनांना या पुलाचा फायदा होणार आहे. या पुलामुळं दादरसोबतच लोअर परेल ते पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात ये-जा करण्यास सोयीचे होणार आहे.
पुलाचा दुसरा भाग खुला झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना तसेच ऑफिसात जाणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, लालबाग परळ या दिवसांत गणेशोत्सवाची धुम असते. मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुलावर अतिरिक्त दबाव पडू शकतो. पुलाच्या या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होण्याची शक्यता असते, विशेषत: गणेशोत्सवादरम्यान लाखो लोक लालबाग परिसरातील मंडळांना भेट देतात तेव्हा यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. कामाला गती द्यावी आणि लवकरात लवकर संपूर्ण पूल खुला करावा, अशी मागणी लोअर परळ मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीचंद देसाई यांनी केली आहे.