लग्नाला जाताना एकाच कारमध्ये कोंबले १२ जण; महापालिकेकडून २१ हजारांचा दंड
वर-वधू आणि वऱ्हाडी असे १२ जण एकाच कारमध्ये कोंबून बसले होते. या सर्वांना तोंडाला मास्कही लावला नव्हता
इंदूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांकडून नागरिकांना वारंवार फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, अनेकजण सरकारच्या या सूचनांना हरताळ फासत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाच एका व्यक्तीला इंदूर महानगरपालिकेने २१ हजारांचा दंड ठोठावला आहे.
अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले- राहुल गांधी
काही दिवसांपूर्वीच या व्यक्तीचे लग्न झाले होते. लग्नाला जात असताना या माणसाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अक्षरश: धाब्यावर बसवले होते. यावेळी नवरा मुलगा आणि वऱ्हाडी असे १२ जण एकाच कारमध्ये कोंबून बसले होते. या सर्वांना तोंडाला मास्कही लावला नव्हता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही गोष्ट पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर या जोडप्यावर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने त्यांना २१ हजारांचा दंड ठोठावला आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत १०८५८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी नागरिकांनी असाच बेफिकिरीपणा दाखवल्यास याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय मतभेदांना मूठमाती द्या, कोरोनाचे युद्ध एकत्र लढू या- अमित शहा
दरम्यान, अनलॉक-१ अंतर्गत भोपाळ शहरात सोमवारी धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. यावेळी भक्तांना केवळ देवळात येण्याची अनुमती आहे. देवाला अगरबत्ती, प्रसाद किंवा कोणताही नैवैद्य दाखवण्यास मनाई आहे. तसेच मंदिरात बसून राहण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.