राजकीय मतभेदांना मूठमाती द्या, कोरोनाचे युद्ध एकत्र लढू या- अमित शहा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते. 

Updated: Jun 15, 2020, 05:54 PM IST
राजकीय मतभेदांना मूठमाती द्या, कोरोनाचे युद्ध एकत्र लढू या- अमित शहा title=

नवी दिल्ली: सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यास लोकांचा विश्वास वाढेल. जेणेकरून दिल्लीवरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर परतवता येईल, असे शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिल्लीतील प्रत्येक नागरिकासाठी कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणाही केली. 

'देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारायला पाहिजे'

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी 'आप'चे नेते संजय सिंह यांनी बैठकीला हजेरी लावली होती. 

अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले- राहुल गांधी

दिल्लीत आतापर्यंत ४१ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १३०० लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत दिवसाला ८६०० चाचण्या केल्या जात आहेत. आगामी पाच दिवसांत ही संख्या १८ हजारपर्यंत वाढवण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे.