नवी दिल्ली : गुरुग्राम येथील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने १६ वर्षांपेक्षा मोठा आरोपी असल्याने त्याला ६ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हत्याप्रकरणी सीबीआयने अकरावीत असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी विद्यार्थ्याला जुवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले होते. सीबीआयच्या वकिलांनी आरोपी विद्यार्थ्याला सहा दिवसाची कोठडी मागितली होती. परीक्षा आणि शिक्षक पालक सभा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याची माहिती सीबीआयने दिलीय. 


ही हत्या पूर्वनियोजित नव्हती. मात्र परिक्षा आणि शिक्षक-पालक मिटींग टाळण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. आरोपी विद्यार्थी चाकू घेऊन त्या दिवशी शाळेत गेला होता. प्रद्युम्नची हत्या केल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने चाकू फ्लश केला. सीसीटीव्हीमुळे संपूर्ण घटना समोर आली. 


या हत्येबाबत आरोपी विद्यार्थ्याच्या दोन मित्रांना माहिती होती. तसेच या हत्येचा लैंगिक शोषणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण सीबीआयने दिलंय. त्याचबरोबर यापूर्वी अटकेत असलेल्या कंडक्टरविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलेय.


या संपूर्ण प्रकारावर आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलाला या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.