मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांनी मिळेल त्या वाहनानं गावची वाट धरली. मुंबईतून अशाच अनेक जणांनी गाव गाठलं. असेच दोन युवक बिहारमधल्या सीतामढीमध्ये त्यांच्या गावी गेले. पण त्यानंतर गावकऱ्यांसोबत घडलेल्या घटनेनं संपूर्ण गावाला धक्का बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे गावात येणाऱ्या लोकांबाबत गावकरी साशंक आहेत. धास्तावलेले गावकरी अशा लोकांची तपासणी व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. गावात आलेल्या लोकांनी होम क्वारंटाईन राहावं म्हणून प्रशासनानंही बजावलंय. पण यामुळे गावात येणारे लोक आणि गावकरी यांच्यात खटके उडत आहेत.


रुन्नीसैदपूरच्या बहरामनगर गावात २० मार्चला मुंबईतून दोन युवक आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली नाही. त्यामुळे गावातील बबलू कुमार या युवकानं कंट्रोल रुमला मुंबईतून आलेल्या तरुणांची माहिती कळवली. कंट्रोल रुमला माहिती दिल्यानंतर सरकारी टीमनं २४ मार्च रोजी दोन्ही तरुणांची तपासणी केली.


या प्रकारानंतर दोन कुटुंबात वाद निर्माण झाला होता. कंट्रोल रुमला माहिती देणारा युवक बबलू कुमार रविवारी संध्याकाळी एकटा दिसल्यानंतर मुंबईतून आलेल्या तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. त्याला इतकं मारलं की बबलू कुमारचा त्यात जागीच मृत्यू झाला.


या घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी तरुणाच्या मृत्यूनंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून दोन जणांना अटक केली आहे.


कोरोनामुळे बाहेरून गावात आलेल्या लोकांच्या तपासणीवरून वाद होण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या असून त्यामुळे गावात तणाव निर्माण होत आहे. बहरामनगर गावात मात्र अशा प्रकरणात एका युवकाला जीव गमवावा लागला.