मुंबई : भारतातील सर्वात रहस्यमय गावांमध्ये राजस्थानच्या कुलधाराचे नाव सर्वात पिहिलं येतं. या गावाबद्दल अनेकांकडून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हे गाव जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. कुळधरा गाव गेल्या 200 वर्षांपासून ओसाड पडले आहे. वाळवंटात वसलेले कुलधरा गाव खूप सुंदर आहे, परंतु येथे राहणारे सर्व लोक 200 वर्षांपूर्वी एका रात्रीत आपलं गाव सोडून गेले होते आणि परत आलेच नाहीत. त्यामुळे या गावात आता कोणीच राहात नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

200 वर्षांपूर्वी, पालीवाल ब्राह्मण कुलधारा गावात राहत होते आणि हे गाव जैसलमेर संस्थानातील सर्वात आनंदी गावांपैकी एक होते.


संस्थानांना या गावातून जास्तीत जास्त महसूल मिळत होते, कारण येथे अनेक प्रकारचे उत्सव, पारंपरिक नृत्य, संगीत महोत्सव होत असत. मात्र, सध्या हे गाव पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे.


बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गावात एका मुलीचं लग्न होणार होतं, जी खूप सुंदर होती. त्यादरम्यान जैसलमेर राज्याचा दिवाण सलीम सिंगची त्या मुलीवर नजर होती आणि तिचे सौंदर्य पाहून त्याने त्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव पाठवला.


सलीम सिंग यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, तो एक अत्याचारी व्यक्ती होता आणि त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या दूरवर प्रसिद्ध होत्या. त्यामुळे कुलधारा गावातील लोकांनी सलीम सिंगसोबत त्यांच्या गावातील मुलीचं लग्न करुन देण्यासाठी नकार दिला.


लग्नाचा प्रस्ताव न स्वीकारल्यानंतर सलीम सिंगने गावकऱ्यांना विचार करण्यासाठी काही दिवस दिले, मात्र त्यानंतरही ते तयार झाले नाहीत. मात्र, सलीम सिंगचे म्हणणे न ऐकल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल हे गावाला माहित होते.


गावकऱ्यांना माहित होते यामुळे सलीम संपूर्ण गावात नरसंहार घडवून आणेल. यानंतर गावातील लोकांनी आपल्या गावातील मुलीची आणि गावाची इज्जत वाचवण्यासाठी कुळधरा गाव कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला.


परंतु असे असले तरी, या गावातील लोक गायब होण्यामागे लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. काही लोकांनी तर याचा संबंध भूत-प्रेतांशी जोडला आहे. परंतु याबद्दल कोणतंही ठोस वक्तव्य कोणीही केलेलं नाही.