प्रशांत अनासपुरे, प्रतिनिधी, झी मीडिया : अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. काल गडकरींची भेट घेतल्यानंतर आज नानांनी अमित शाहांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र ही भेट व्यक्तीगत कामासाठी घेतल्याचा दावा नानांनी केला आहे. पण नाम फाऊंडेशनसाठी परदेशी देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळावी यासाठी ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं सुरू आहेत. ही कामं जनतेकडून आलेल्या देणग्यांच्या माध्यमातून केली जातात. परदेशातूनही अनेक जण देणगी देण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र नवीन कायद्यानुसार परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांवर नियंत्रण आलंय.


मागच्याच आठवड्यामध्ये नाना पाटेकर यांनी सांगली आणि कोल्हापूरला भेट दिली होती. पूरग्रस्तांसाठी दीड हजार घरं बांधण्याचा संकल्प नाना पाटेकर यांनी यावेळी केला होता. मागच्या एक ते दीड वर्षापासून नाम फाऊंडेशनला परदेशातून देणग्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ही परवानगी मिळत नसल्यामुळे नाम फाऊंडेशकडून प्रयत्न केले जात आहेत.


कोल्हापूर-सांगलीतल्या पूरग्रस्तांना तातडीने घरं बांधून द्यायची आहेत, त्यासाठी निधी लागणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधून नागरिक नाम फाऊंडेशनला मदत देण्यासाठी इच्छुक आहेत, पण या मदतीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. ही परवानगी नसल्यामुळे परदेशातून देणग्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी नाना पाटेकर यांनी अमित शाह यांची भेट घेतली.