तनुश्रीच्या आरोपांना नाना पाटेकर लवकरच जाहीरपणे उत्तर देणार
सुरुवातीला नाना पाटेकर यांनी आपण माध्यमांना स्पष्टीकरण देण्याच्या फंदात न पडता कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.
जयपूर: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली होती. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे दिवसेंदिवस हे प्रकरण तापत चालले आहे. अशातच बॉलिवूडमधील काही कलाकार तनुश्रीच्या पाठिशी उभे राहिल्याने नाना पाटेकर यांच्याभोवतीचे संशयाचे धुके गडद झाले होते.
सुरुवातीला नाना पाटेकर यांनी आपण माध्यमांना स्पष्टीकरण देण्याच्या फंदात न पडता कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे प्रकरण दिवसेंदिवस तापत असल्याने नाना पाटेकर यांनी जाहीरपणे आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊनच ते आपल्यावरील आरोपांना उत्तर देणार आहेत.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर सध्या राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. चित्रीकरण आटोपल्यानंतर ते मुंबईत परतणार असून पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहेत. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारू शकता. मी काहीही लपवणार नाही. तसे करण्याची काहीच गरज नसल्याचे नाना पाटकेर यांनी सांगितले.