नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी भले मोठमोठी भाषणे देत असतील पण त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत बोलायचे असल्यास त्यांना टेलीप्रॉम्टर लागतो, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. त्या शुक्रवारी नदिया जिल्ह्यातील एका सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. पश्चिम बंगालने गुरुवारी केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आयुषमान भारत योजनेच्या लेटरहेडवर नरेंद्र मोदींची छबी आणि कमळ छापण्यात आले आहे. याठिकाणी भारत सरकारचा लोगो असायला हवा. त्यामुळे आम्ही आयुषमान भारत योजनेचे समर्थन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या इंग्रजीच्या ज्ञानावरही टिप्पणी केली. नरेंद्र मोदी मोठमोठी भाषणे देतात. मात्र, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजी बोलायचे असल्यास त्यांना टेलीप्रॉम्टरची गरज लागते. प्रसारमाध्यमांना ही गोष्टी माहिती आहे. त्यामुळे मोदी इंग्रजी भाषणावेळी केवळ स्क्रीनवर लिहलेले वाचतात. परंतु आम्ही अशा कोणत्याही साधनांचा वापर करत नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १९ तारखेला ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यावेळी भाजपविरोधी पक्ष एकाच मंचावर जमण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा समावेश आहे.