अहमदाबाद : लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सर्व मतदारसंघांत आज मतदान पार पडतंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मतदान केलं. मतदानासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादमधल्या रानिपमध्ये दाखल झाले. 'सुपर इंग्लिश स्कूल'मधल्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. खुल्या जीपमधून मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचलेल्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह आपल्या कुटुंबीयांसमवेत दाखल झाले होते. यावेळी, एक चिमुरडी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चिमुरडीला उचलून कडेवर घेतलं... ही चिमुरडी होती अमित शाह यांची नात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी या चिमुरडीला उचलून घेत तिचे लाड पुरवले आणि तिला आशीर्वादही दिले. त्यांनी या मुलीसोबत 'व्हिक्ट्री'चं V निशाण आपल्या बोटांनी दाखवलं.


या चिमुरडीनं याआधी आपल्या आजोबांच्या एका प्रचारसभेतही सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. प्रचारसभेत पांढऱ्या रंगाची छान फुलांची टोपी घालून आलेल्या आपल्या नातीला भाजपची प्रचार टोपी घालण्याचा प्रयत्न अमित शाह करत होते. परंतु, त्यांचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. भाजपची टोपी बाजुला करत तिने आपली आवडती टोपी घातल्यावरच तिचं समाधान झाल्याचं एका व्हिडिओतून दिसलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 



मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर त्यांनी आपल्या अहमदाबादमधील घरी जाऊन आई हीराबेन यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी मोदींच्या आई हीराबेन यांनी पंतप्रधानन मोदींना दुर्गामातेची ओढणी आणि नारळ भेट दिलं. तसंच मोदींना टिळा लावून आशीर्वादही दिले.


पंतप्रधान मोदींच्या मतदानानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही अहमदाबादच्या नारनपुरामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनल शाह यादेखील उपस्थित होत्या. 


लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सर्व म्हणजेच २६ मतदारसंघ, केरळच्या सर्व अर्थात २० मतदारसंघ, आसामच्या चार, बिहारच्या पाच, छत्तीसगडच्या सात, ओडिशाच्या सहा, उत्तरप्रदेशच्या १०, पश्चिम बंगालच्या पाच, गोव्याच्या दोन तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकी १४-१४ मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच दादर नगर हवेली, दीव दमन आणि त्रिपुराच्या एका-एका मतदारसंघातही आज मतदान पार पडतंय.