नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराची सांगता होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या कार्यकाळातील पहिलीवहिली पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे अनेकांना या पत्रकार परिषदेची प्रचंड उत्सुकता होती. याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील दिल्लीत पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्यांना नरेंद्र मोदी घेत असलेल्या पत्रकार परिषदेविषयी प्रतिक्रिया विचारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावर राहुल यांनी मोदींच्या या कृतीचे स्वागत केले. अखेर पाच वर्षांमध्ये मोदी पहिली पत्रकार परिषद घेत आहेत, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, माझ्या माहितीनुसार या पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांना प्रवेशच देण्यात आला नाही. मी आपल्या बाजूने दोन तीन पत्रकार पाठवा असं सांगितलं होते. जेणेकरून मोदींना काही प्रश्न विचारता येतील. मात्र, मोदींची पत्रकार परिषद असणाऱ्या कक्षाचे मागचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेक पत्रकारांना आतमध्ये घेण्यातच आले नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच मोदी या पत्रकार परिषदेला एकटेच न येता अमित शहा यांना सोबत घेऊन का आले? एवढेच होते तर नरेंद्र मोदींनी जाहीर चर्चेचे माझे निमंत्रण का स्वीकारले नाही?, असे सवालही राहुल यांनी उपस्थित केले. 




याशिवाय, राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीवरही टीका केली. मोदींची विचारसरणी ही महात्मा गांधी यांची विचारसरणी नाही. तर ती हिंसेची विचारसरणी आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे 'गॉड-से' प्रेमी नसून 'गोडसे' प्रेमी असल्याची शाब्दिक कोटीही राहुल यांनी केली. तसेच भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कोणतेही स्थान नसल्याची टीकाही त्यांनी केली. ज्येष्ठ नेत्यांना पक्षातून धक्के मारून बाहेर काढायला, मी नरेंद्र मोदी नाही. आमच्या पक्षातील सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा मी पक्षासाठी फायदा करून घेईन, असेही राहुल यांनी सांगितले.