नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी संसदीय दलाच्या बैठकीत भाजप खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मोदी काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप संसदीय दलाची बैठक सकाळी होणार आहे. आरबीआय - सरकारमधील वाद, राफेल भ्रष्टाचार मुद्दा, कावेरी मुद्द्यावरून विरोधकांनी तर राम मंदिर मुद्द्यांवरून मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भाजप खासदारांना कोणता संदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. 


भाजप बॅकफूटवर



दरम्यान, ताब्यात असलेली तिन्ही राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपला बॅकफूटवर जावे लागले आहे. भाजपचा राज्यांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांतील भाजप प्रदेशाध्यांची बैठक बोलविलेय. ही बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात दुपारी दोन वाजता होणार आहे.


२०१९मधील लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीतील पराभवानंतर खचून जाऊ नये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासंदर्भात अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शाह हे सल्ला देणार की नेत्यांची खरडपट्टी काढणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.