नवी दिल्ली: भाजपच्या प्रचारातील 'मै भी चौकीदार हूं' आणि 'मोदी है, तो मुमकिन है' या दोन घोषणा सध्या चांगल्याच गाजत आहेत. या घोषणांमुळे झालेल्या वातावरणनिर्मिचा फायदाही भाजपला होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हाच फॅक्टर भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे या आकर्षक घोषणांचा निर्माता नक्की कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका लेखातून याचा खुलासा झाला आहे. त्यानुसार भाजपने निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहिरात तज्ज्ञांची फौज कामाला लावली आहे. मात्र, त्यांच्या जाहिराती किंवा घोषवाक्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भाजपच्या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा भाजपच्या मदतीला धावून आले. मोदींनी जाहिरात तज्ज्ञांच्या घोषवाक्यात काही बदल सुचवले आणि त्याला चांगलेच यश मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाहिरात तज्ज्ञांकडून प्रचारासाठी सुरुवातीला 'नामुमकिन अब मुमकिन है', असे घोषवाक्य तयार करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींचे नाव नसल्यामुळे या घोषणेला तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका प्रचारसभेत मोदींनी थोडासा बदल करून ही घोषणा नव्याने लोकांसमोर आणली. पूर्वीच्या घोषणेपेक्षा त्यांची 'मोदी है, तो मुमकिन है', ही घोषणा अधिक लोकप्रिय ठरली. 


मात्र, यानंतरही भाजपच्या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. काँग्रेसची 'चौकीदार चोर है' ही घोषणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा मोदींनी 'मै भी चौकीदार हूं' असा नारा देत काँग्रेसला शह दिला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापूर्वी 'चौकीदार' असा शब्द लावून या घोषणेची आणखी वातावरणनिर्मिती केली. सोशल मीडियावर या मोहिमेला चांगलेच यश मिळाले. 


२०१४ च्या निवडणुकीतही काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदींना चायवाला म्हणून हिणवले होते. मात्र, मोदींनी चायवाला हाच शब्द वापरून प्रचारमोहीम सुरु केली होती. त्यामुळे भाजपच्या संपूर्ण प्रचाराचा रोख बदलला होता.