नवी दिल्ली: नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले पाहिजेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केले. ते बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी मुलायमसिंह यांनी मोदींचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलायमसिंह यांनी म्हटले की, गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. त्यामुळे माझी एवढीच इच्छा आहे की, आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत, असे मुलायमसिंह यांनी म्हटले. यावेळी सभागृहातील सदस्यांमध्ये हास्याची लकेर उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हसतहसत मुलायमसिंह यांना अभिवादन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहजिकच मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातली अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात युती करून मोदी सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना मुलायमसिंह यांनी असे वक्तव्य का केले, याचे कोडे अनेकांना पडले आहे.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सभागृहाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच अनेक निर्णयांमध्ये सहकार्य केल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे आभार मानले. १६ व्या लोकसभेच्या निमित्ताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे गोत्र नसलेले पूर्ण बहुमतातील सरकार आले. या सगळ्याचे श्रेय २०१४ साली जनतेने घेतलेल्या निर्णयाला जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.