अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) चांद्रयान 3 चा फोटो काढला आहे. हा फोटो त्या ठिकाणचा आहे, जिथे चांद्रयान 3 चं विक्रम लँडर उतरलं होतं. नासाने फोटोत चौकोन करत ही लँडिग साईट दाखवली आहे. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश असून, 23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने लँडिग केलं. यानंतर चौथ्या दिवशी 27 ऑगस्टला एलआरओमधून हा फोटो काढण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाने ट्विटरला हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "एलआरओ स्पेसक्राफ्टने नुकताच चंद्राच्या पृष्ठभागावरील चांद्रयान 3 चा फोटो काढला".


नासाने दिलेल्या माहितीनुसार, ही जागा चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किमी दूर आहे. आमच्या एलआरओ म्हणजे लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमध्ये लागलेल्या LROC म्हणजेच एलआरओ कॅमेऱ्याने चांद्रयान 3 च्या लँडिंग साईटचा ओबलीक व्हू (oblique view) दिला आहे. 



ओबलीक व्हू म्हणजेच 42 डिग्री स्लिव्ह अँगल. लँडिगंच्या चार दिवसांनी हा फोटो काढण्यात आला आहे. जिथे विक्रम लँडर उतरला आहे, तिथे चारही बाजूला सफेद रंगाचं हॅलो दिसत आहे, जी लँडरच्या इंजिनामुळे उडालेला धूळ आहे. LRO ला नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरकडून संचलित केलं जातं. 


चंद्रावर आता रात्र झाली आहे. यामुळे तिथे अंधार असल्याने विक्रम लँडर बंद करण्यात आला असून, विश्रांती घेत आहे. लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे सर्व पेलोड्स बंद कऱण्यात आले आहेत. फक्त लँडरचा रिसीव्हर ऑन आहे, जेणेकरुन त्याला पुन्हा उठवता येईल. विक्रम आणि प्रज्ञान चंद्राच्या ज्या ठिकाणावर आहेत तिथे 14-15 दिवसांची रात्र आहे. 


जर लँडर आणि रोव्हरने तेथील तापमान सहन केलं, तर कदाचित पुन्हा दिवस झाल्यानंतर ते अॅक्टिव्ह होऊ शकतील. पण याची शक्यता फारच कमी मानली जात आहे. विक्रम लँडर हा पृथ्वीपासून तब्बल 3 लाख 71 हजार 841 किमी दूर आहे. 


आता पुढील 14-15 दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या आसपास रात्र असेल. तापमान उणे 250 अंश सेल्सिअसच्या खालीही जाऊ शकते. लँडर-रोव्हर्स थंडी सहन करू शकत असल्यास, 14-15 दिवसांनी सूर्य उगवल्यावर त्यांना त्यांच्या सौर पॅनेलद्वारे चार्ज करता येईल.