तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच आहे. त्यांच्यात फारसा फरक नाही. नथुराम गोडसे आणि मोदींमध्ये इतकाच फरक आहे की, आपण गोडसे समर्थक आहोत हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. ते गुरुवारी केरळ येथील प्रचारसभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना मारले कारण, त्याचा स्वत:वर विश्वास नव्हता, त्याने कधीच कोणावर प्रेम केले नाही, त्याला कोणाचीही पर्वा नव्हती, त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. हीच गोष्ट आपल्या पंतप्रधानांना तंतोतंत लागू पडते. त्यांचा विश्वास आणि प्रेम हे केवळ स्वत:पुरतेच मर्यादित आहे, असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला.



तुम्ही जेव्हा नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि रोजगारासंदर्भात काही विचाराल, तेव्हा मोदी लगेच तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. नागरिकत्व सुधारणा विधेयक( CAA),  राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)काश्मीरच्या मुद्दयावर चर्चा करून रोजगार निर्माण होणार नाहीत, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


काँग्रेसची गांधीगिरी; मोदींना पाठवले कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल


तसेच आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारतीयत्व सिद्ध करण्याची गरज नाही. आपल्या देशातील लोकांची जडणघडणच भारतीय आहे. त्यामुळे आम्ही भारतीय आहोत किंवा नाही, हे ठरवणारे मोदी कोण? मोदींना हा अधिकार कोणी दिला? मी भारतीय आहे, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, असेही यावेळी राहुल यांनी सांगितले.