नथुराम गोडसे हे देशभक्तच; साध्वी प्रज्ञांनी कमल हासन यांना ठणकावले
नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.
भोपाळ: नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील, असे सांगत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कमल हासन यांना प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी नथुराम गोडसे स्वतंत्र भारतामधील पहिला दहशतवादी असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून बराच गदारोळही झाला होता. तसेच कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी साध्वी प्रज्ञा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वींच्या या वक्तव्यानंतर भाजपला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. टीकेचा जोर वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी या वक्तव्याबद्दल माफीही मागितली होती.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीवर अनेकांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.