प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याने प्रियंका गांधींनी बालहक्क आयोगाकडून नोटीस
या मुलांची नावे, पत्ते आणि हा प्रकार नेमका कुठे घडला, याची सविस्तर माहितीही मागवली आहे.
नवी दिल्ली: प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करून घेतल्याच्या आरोपावरून गुरुवारी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना नोटीस बजावली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रियंका यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये काही लहान मुले प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत 'राहुल गांधी, प्रियंका गांधी जिंदाबाद' असे नारे देताना दिसत आहेत. तसेच यावेळी एका लहान मुलाने मोदींबद्दल अपशब्दही उच्चारले होते. त्यावेळी प्रियंका यांनी तात्काळ त्या लहान मुलाला हटकलेही होते. मात्र, हाच मुद्दा धरून भाजपचे नेते प्रियंका यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बालहक्क आयोगाने प्रियंका यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बालहक्क आयोगाने यासंदर्भात निवडणूक आयोगालाही कळवले आहे. या व्हीडिओत प्रियंका गांधी यांनी बालहक्कांचे उल्लंघन केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यासाठी बालहक्क आयोगाने या मुलांची नावं, पत्ते आणि हा प्रकार नेमका कुठे घडला, याची सविस्तर माहितीही मागवली आहे. याशिवाय, ही मुले त्याठिकाणी कशी आली, याबद्दल तीन दिवसांच्या आत सविस्तर खुलासा करण्याचे आदेशही बालहक्क आयोगाने दिले आहेत.
या व्हीडिओवरून भाजप नेत्या स्मृती इराणी यांनीही प्रियंका गांधी यांना फटकारले होते. सुसंस्कृत घरातील पालकांनी आपल्या मुलांना प्रियंका यांच्यापासून दूर ठेवावे, असा टोमणाही इराणी यांनी लगावला होता.
याशिवाय, रायबरेली मतदारसंघात प्रचार करतानाही एका गारुड्याच्या टोपलीतील साप हातात घेतल्याप्रकरणीही प्रियंका गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वन्यजीव महामंडळाचे अधिकारी जयप्रकाश सक्सेना यांनी रायबरेली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.