फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक, जम्मू तुरुंगात स्थानांतरण
जम्मूमध्ये झालेला ग्रेनेड हल्ला आणि यासीन मलिकची अटक या घटनांचा संबंध?
जम्मू : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक याला 'पब्लिक सेफ्टी ऍक्ट' (पीएसए) खाली अटक करण्यात आली आहे. यासीन मलिक याला आज जम्मूमध्ये कोट भलवालच्या तुरुंगात स्थानांतरीत केलं जातंय. यासीन मलिक याला २२ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं. परिसरात दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली मलिकविरोधात कोठी बाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या प्रवक्त्यानं, आज सकाळीच यासीन मलिकला पीएसए कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचं सांगितलंय. 'मनमानी पद्धतीनं' करण्यात आलेल्या या अटकेचा निषेधही त्यांनी केलाय.
जम्मू बस स्थानकात ग्रेनेड हल्ला
दरम्यान, आज दुपारी १२ वाजल्या दरम्यान गजबजलेला परिसर असणाऱ्या जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्याचा आणि यासिन मलिकच्या अटकेचा काही संबंध आहे का? हेही तपासण्यात येतंय. हा दहशतवादी हल्ला असल्याचं, जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार १८ जण या स्फोटात जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. एका बसमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळतेय. त्यानंतर घटनास्थळी जम्मू काश्मीरचे पोलीस आणि सीआरपीएफ पथक दाखल झालंय. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय.
बस स्थानकाच्या बाहेरून फेकण्यात आला आणि हा ग्रेनेड बसखाली फुटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. दरम्यान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.