कोरोनाबाबतची देशातील या क्षणाची सर्वात मोठी बातमी
तब्बल ६४,४२५ रुग्णांनी....
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
एका दिवसात सहा हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळं आता देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १,५१,७६७ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये ८३००४ रुग्णांवर अद्यापही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. तर, तब्बल ६४,४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आतापर्यंत देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ४३३७ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. देशात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही कोरोनतून सावरणाऱ्यांचा आकडा हा दिलासा देणारा आहे. ज्या आधारावर आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ४२.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
वाचा : देशात पारा ५० अंशांवर; 'या' भागात सर्वाधिक तापमानाची नोंद
मृत्यूदरात घट
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात देशात काही प्रमाणात घट आली आहे. जवळपास ३.३ टक्क्यांवरुन आता मृत्यूदर २.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ही सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाची आणि तितकीच मोठी बाब ठरत आहे. जागतिक स्तरावरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदराशी तुलना केल्यास भारताच्या दरात बरीच तफावत आहे. ही बाब अतिशय दिलासादायक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात घटणाऱ्या या मृत्यूदराचा आकडा आणखी कमी होऊन कोरोनावर मात करण्यात देश यशस्वी ठरेल याबाबत सारेच आशावादी आहेत.