देशात पारा ५० अंशांवर; 'या' भागात सर्वाधिक तापमानाची नोंद

उकाड्यानं सारे बेजार 

Updated: May 27, 2020, 08:47 AM IST
देशात पारा ५० अंशांवर; 'या' भागात सर्वाधिक तापमानाची नोंद  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशाच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी सर्वाधिक म्हणजेत ४६ ते ४७ अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. १९४४ नंतर तापमानाने इतका उच्चांक गाठल्यामुळं सर्वांनाच भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तर, देशातील आणि जगातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून राजस्थानमधील चुरूची नोंद करण्यात आली. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मंगळवारी भारतातील राजस्थानमध्ये असणाऱ्या चुरू येथे पारा थेट ५० अंश सेल्शिअसवर पोहोचला होता. आयएमडीतील संशोधक रवींद्र सिहग यांनी याविषयीची माहिती दिली. 

देशात वाढणारी उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा इशारा यापूर्वीच हवामान खात्याकडून देण्यात आला होता. देशाच्या मध्य आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट सर्वांना बेजार करणार असून, त्यातच कोरडे वारेही घोंगावणार असल्याची माहिती देण्यात आली. 

तापमानाचा चढता पारा पाहता आयएमडीकडून हरियाणा, पंजाब, चंदीगढ, राजस्थान या भागांमध्ये येत्या काही दिवसांसाठी रेड अलर्ट अर्थात सावघदिरीचा इशारा देण्यात आला आहे. ज्याअंतर्गत वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

वाचा : चीनच्या अध्यक्षांच्या पत्नीचं WHO सोबत काय आहे कनेक्शन?

 

पाकिस्तानमध्येही कहर...

राजस्थानमधील चुरूप्रमाणेच पाकिस्तानमधील जेकबाबाद येथेसुद्धा ५० अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. ज्या आधारे जागतिक स्तरावर या दोन भागांमध्ये मंगळवारचा दिवस हा सर्वाधिक उष्ण असल्याची बाब निश्चित झाली.