७२ तासांनंतर बचावकार्यात यश, अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका
शुक्रवारी दक्षिण हिंदी महासागरात आलेल्या वादळानंतर हे संकट ओढवलं होतं.
मुंबई: गोल्डन ग्लोब रेस २०१८ मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल ७२ तासांच्या बचावकार्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. गोल्डन ग्लोब रेसदरम्यानच, शुक्रवारी दक्षिण हिंदी महासागरात आलेल्या वादळामुळे त्यांच्या 'थुरिया' या भारतीय बनावटीच्या नौकेचं नुकसान झालं होतं.
फ्रान्सच्या 'ओसिरिस' या जहाजाच्या मदतीने टॉमी यांच्यापर्यंत मदत पोहोचणं शक्य झालं.
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून टॉमी यांची प्रकृती उत्तम असून, पुढे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मॉरिशस येथे नेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. 'आयएनएस सातपुडा'ने टॉमी यांना मॉरिशसला नेण्यात येणार आहे.
दक्षिण हिंदी महासागरात आलेल्या वादळानंतर टॉमी यांची नौका भरकटत गेली. ज्यानंतर भारतीय नौदलाच्या विमानाने त्यांच्या नौकेचं ठिकाण शोधून काढलं.
दरम्यान, टॉमी यांनी या रेसच्या आयोजकांशी संपर्क साधण्यात यश मिळवत त्यांना एक संदेश पाठवला होता. 'ईपीआयआरबी (ट्रॅकिंग) चालू आहे. स्ट्रेचरची आवश्यकता भासू शकते, चालू शकत नाही... बोटीत सुरक्षित आहे, पुढे जाऊ शकत नाही, सॅट फोन बंद आहे' असं ते आपल्या मॅसेजमध्ये म्हटले होते, ज्यानंतर कोड रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.