छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग टेकलगुडेम गावात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात फोर्स दाखल झाली आहे. दुसरीकडे परिसराला घेराव घालण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सुकमाच्या जरगगुंडा परिसरात नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मदत करण्याच्या हेतूने 30 जानेवारीला सुरक्षा कॅम्प उभारण्यात आला होता. कॅम्प उभारल्यानंतर सीआरपीएफचे कोब्रा जवान जोनागुडा-अलीगुडा क्षेत्रात सर्च ऑपरेशन सुरु होतं. याचवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. 


सुरक्षा जवानांकडून गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यातआलं. यानंतर घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढण्यास सुरुवात केली. या चकमकीत गोळी लागल्याने 3 जवान शहीद झाले, तर 14 जखमी झाले. जखमी जवान सध्या धोक्याच्या बाहेर असून, उपचारासाठी त्यांना रायपूरला पाठवण्यात आलं आहे. 


गतवर्षी डिसेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी नक्षलवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2023 रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथे आयईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये एक जवान शहीद, तर एक जखमी झाला होता. राजधानीत विष्णुदेव साय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत असतानाच हा हल्ला झाला होता.