नवी दिल्ली : शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तकात होणाऱ्या चुकांची प्रकरणे देशभरात काही नवीन नाहीत.  काही प्रमाणात चुका या नजरचुकीने, छपाईवेळी वगैरे होत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा किरकोळ चुका जरी माफ केल्या तरी धक्कादायक वृत्त हाती आले आहे. एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमध्ये तब्बल १३०० पेक्षा जास्त चुका आढळल्या आहेत. यामुळे हा अभ्यासक्रम सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. 


यासंबधीची कबुली केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या चुकांची दखल घेण्यात आली आहे. एनसीईआरटी लवकरच संबंधित पुस्तकांच्या सुधारित आवृत्तींचे प्रकाशन करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


विविध राज्यांच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पुस्तकांमध्ये सुचविल्याप्रमाणे पुस्तकांची सुधारित आवृत्ती काढण्यात येणार आहे.


'चुकांचा अहवाल'


दिल्लीत एनसीईआरटीची ५४वी बैठक अलिकडेच पार पडली. या बैठकीत दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुस्तकांच्या संदर्भातला एक अहवाल सादर केला आणि अनेक चुका निदर्शनास आणून दिल्या.


त्यामुळे याला 'चुकांचा अहवाल' च म्हणायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


२००७ पासून छपाई सुरू


एनसीईआरटीच्या पुस्तकांसाठी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (एनसीएफ) या समितीची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली होती. समितीने निश्चित केलेला मजकूर वापरुन २००७ मध्ये पुस्तकांची छपाई सुरू करण्यात आली.