`शाळेत दंगली, द्वेष, हिंसाचार का शिकवायचा?` बाबरी, गुजरात दंगल संदर्भ वगळल्यावर सवाल
NCERT New Syllabus Textbooks: नव्या पाठ्यपुस्तकांमधून अनेक संदर्भ वगळण्यात आले असून अभ्यासक्रमाचं भगवेकरण होत असल्याचा आरोपही खोडून काढण्यात आला आहे.
NCERT New Syllabus Textbooks: राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन बदलांमध्ये दंगलींबद्दलचे संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून हटवण्यात आले आहेत. एनसीईआरटीचे संचालक दिनेस प्रसाद सकलानी यांनी या बदलांमागील भूमिका स्पष्ट करताना, 'दंगलींबद्दल शिकवल्यास हिंसक व वैफलग्रस्त नागरिक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आम्ही शालेय पाठ्यपुस्तकातील गुजरात दंगल, बाबरी मशीदीबद्दलचे संदर्भ सुधारले आहेत,' असं म्हटलं आहे.
आम्हाला नैराश्यग्रस्त नागरिक घडवायचे नाहीत
पाठ्यपुस्तकांमधून गुजरात दंगलीबरोबरच बाबरीबद्दलचे संदर्भ बदलण्यात येण्यामागील भूमिका सकलानी यांनी स्पष्ट केली. "आम्ही दंगलीबाबत विद्यार्थ्यांना का शिकवावे?" असा सवाल सकलानी यांनी उपस्थित केला आहे. "आम्हाला हिंसक तसेच नैराश्यग्रस्त नारगिक तयार करायचे नसून सकारात्मक नागरिक घडावायचे आहेत," असं सकलानी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. "विद्यार्थ्यांनी आक्रमक व्हावे, समाजात द्वेष निर्माण करावा आणि स्वत:सुद्धा द्वेषाला बळी पडावे अशी शिकवण देणारं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना द्यायचं का? आपण त्यांना हे शिकवायचं का? दंगलींसंदर्भात बालकांना का शिकवायचे? ते मोठे (सज्ञान) होतील तेव्हा याबद्दल शिकू शकतात. मात्र शालेय अभ्यासक्रमात त्यांना हे असे धडे का द्यायचे? मोठे झाल्यानंतर त्यांना काय घडलं? कसं घडलं? का घडलं? हे समजू घ्यायला हवं. या बदलांसंदर्भात ओरड करणं अनावश्यक आहे," असं सकलानी म्हणाले.
नवे कोणते बदल केले?
नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक संदर्भ वगळण्यात आले आहेत. 12 वी इयत्तेच्या राज्यशास्त्राच्या सुधारीत पाठ्यपुस्तकात बाबारी मशिदीचा थेट उल्लेख वगळला आहे. अयोध्येच्या वादाचा इतिहास 4 पानांऐवजी 2 पानांमध्ये उरकला आहे. नव्या अवृत्तीमध्ये अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वेच्च न्यायालयाचा निर्णयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.काय काय काढलं अभ्यासक्रमातून? भाजपाने गुजरातमधील सोमनाथमधून अयोध्येपर्यंत काढलेल्या रथयात्रेच्या तपशीलाबरोबरच, कारसेवकांची भूमिका, बाबरी पाडल्यानंतर घडलेला जातील हिंसाचार एनसीईआरटीच्या अभ्यास क्रमातून वगळण्यात आला आहे. बाबरी हा उल्लेखही वगळण्यात आला असून अयोध्येमध्ये 'तीन घुमटांची ढाचा' होती असा संदर्भ देण्यात आला आहे.
भगवेकरण कसे काय?
द्वेष आणि हिंसाचार हे काही शिकवण्याचे विषय नाहीत. आमची पाठ्यपुस्तकं त्यावर लक्ष केंद्रित करणारी असू नयेत. 1984 च्या दंगलीचा उल्लेख नसल्यावरुन असा गदारोळ होत नाही, असंही सकलानी म्हणाले. तसेच त्यांनी एनसीईआरटीमध्ये अभ्यासक्रमाचे भगवेकरण होत असल्याचा आरोपही फेटाळला आहे. आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत असू तर ते भगवेकरण कसे झाले? असा सवाल सकलानी यांनी उपस्थित केला.