रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरेही उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीनंतर पुन्हा अमित शाह आणि शरद पवार यांच्यात 15 मिनिटं वेगळी बैठक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, NDRF च्या नियमांमध्ये आवश्यक बदलासंदर्भातला हा एक होता. 


1 - नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांना राज्य सरकार 5 लाख देते तर केंद्र सरकार 2 लाख देते. यात बदल करावं. केंद्रानं 4 किंवा 5 लाख रूपये द्यावे. त्यामुळे राज्य सरकारवरचा बोजा कमी होईल.


2 - पूरग्रस्त भागात घराचं नुकसान झालं तर राज्य सरकार दीड लाख देते तर केंद्र 90 हजार देते. यात बदल करावा.


3 - एनडीआरएफचं कॅम्प महाड मध्ये स्थापन करावा. एनडीआरएफ कॅम्प केवळ मुंबई पुण्यात आहेत. परंतु गरज कोकणात आहे.


याशिवाय, या बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी अमित शहांकडे करण्यात आली. यावेळी लवकरच सरकार इथेनॉलबाबत नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.


मोदींच्या भेटीनंतर पवार काय म्हणाले होते?


महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवार म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं पत्रही पोस्ट केलं होतं. 


नवी दिल्लीत शरद पवारांच्या भेटीगाठी


शरद पवार यानी गेल्या काही दिवसात दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. 17 जुलैला शरद पवार यांनी पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्याआधी ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले. तर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांचीही शरद पवार यांनी भेट घेतली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली होती.