शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले `नेमकी कसली भीती...`
NCP on Shahrukh Khan: बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) नव्या संसद इमारतीच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते आता शाहरुखच्या चित्रटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे.
NCP on Shahrukh Khan: देशाच्या नव्या संसद भवनाचं (New Parliament building) रविवारी उद्घाटन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हे नवे संसद भवन देशातील 140 कोटी जनतेच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असून ही इमारत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची साक्षीदार असेल असं म्हटलं. दरम्यान उद्धाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ आपल्या आवाजात शेअर करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनला बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) प्रतिसाद दिला होता. दरम्यान त्याने नव्या संसद इमारतीच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते आता शाहरुखच्या चित्रटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे.
शाहरुख खानने ट्वीट करताना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला होता. तसंच त्याने व्हिडीओ आपल्या आवाजात शेअर केला होता. "जे लोक आपल्या संविधानाची रक्षा करतात, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि लोकांच्या विविधतेचे रक्षण करतात त्यांच्यासाठी हे एक भव्य नवीन घर आहे. नवीन भारतासाठी संसदेची इमारत, पण भारताच्या गौरवाचे जुने स्वप्न. जय हिंद!", असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान शाहरुख खानच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो (Clyde Crasto) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शाहरुख खान आता नव्या संसदेच्या बाजूने बोलला आहे, त्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातील नेते आता त्याच्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत," असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांच्या समर्थनार्थही ट्वीट करण्याचं आवाहन केलं आहे. "शाहरुख खान आणि अक्षय कुमार दोघांनीही ट्वीट करत नव्या संसद भवनाच्या इमारतीवर भाष्य केलं आहे. दोघांनीही खेळावर आधारित चित्रपटांमध्ये काम केलं असून प्रसिद्धी मिळवली आहे. न्यायाची मागणी करणाऱ्या या खेळाडूंच्या समर्थनार्थ ट्वीट करणाऱ्यांपासून त्यांना कोण रोखत आहे? कोणाची आणि कशाची भीती वाटत आहे?," अशीही विचारणा त्यांनी केली आहे.
शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी त्यांच्या व्हॉईस-ओव्हरसह रविवारी उद्घाटन झालेल्या संसदेच्या नवीन इमारतीबद्दल आपले विचार व्यक्त करणारे व्हिडिओ शेअर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट त्यांनी रिट्वीट केली होती. पंतप्रधानांनी 26 मे रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि लोकांना त्यांच्या व्हॉईस-ओव्हरसह शेअर करण्याची विशेष विनंती केली होती.
शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करत बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. यामध्ये अनेक भाजपा नेत्यांचाही समावेश होता. भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला होता.