सियाचीनमध्ये आर्मी कॅम्पला आग लागल्यानंतर शौर्य दाखवताना शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग (hero Captain Anshuman Singh) यांच्या पत्नीला सोशल मीडियावर अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागला होता. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कीर्ती चक्र देण्यात आलेले कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नी स्मृती सिंग यांच्यावर अश्लील कमेंट करणारी व्यक्ती पाकिस्तानातील असल्याचं सांगितलं आहे. ही व्यक्ती पाकिस्तानमधील सोशल मीडिया युजर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेचा विनयभंग आणि अश्लील साहित्य ऑनलाइन प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.


एएनआयशी बोलताना रेखा शर्मा यांनी सांगितलं होतं की, "सोशल मीडियावर आम्ही पाहिली ती फार खालच्या दर्जाची कमेंट होती. आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही व्यक्ती पाकिस्तानमधील असण्याची शक्यता आहे".


कॅप्टन अंशुमन सिंग यांना गतवर्षी सियाचीन ग्लेशियर येथे लष्कराच्या छावणीत लागलेल्या आगीदरम्यान दखवलेल्या शौर्याबद्दल भारताचा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कीर्ती चक्राने मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. स्मृती सिंह आणि त्यांच्या सासू यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा सन्मान स्वीकारला.


एका युजरने स्मृती सिंगच्या यांच्या पुरस्कार स्वीकारतान्या फोटोवर अपमानजनक टिप्पणी केली होती. यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर महिला आयोगाने पोलिसांत तक्रार केली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटसह एफआयआर नोंदवला आहे. ज्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन टिप्पणी करण्यात आली, त्याचा पोलीस तपशील शोधत आहेत. महिला आयोगाने त्वरीत तपास आणि तीन दिवसांत केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याची मागणी केली आहे.


"अशा अनेक टिप्पण्या केल्या जात आहेत आणि आम्ही त्या टिप्पण्या गांभीर्याने घेत आहोत आणि त्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करत आहोत," असं शर्मा यांनी पुढे सांगितलं.


दुसरीकडे कॅप्टन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंग यांनी सुनेने मुलाच्या इतर वस्तूंसह शौर्य पुरस्कार नेल्याचा आरोप केला आहे. यावर भाष्य करताना त्यांनी संयम ठेवण्याचं आमि चर्चेतून वाद सोडवण्याचं आवाहन केलं.