नवी दिल्ली : देशात गोहत्याबंदीचा सक्षम कायदा आणण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत अशा प्रकारचा कायदा आणेल, अशी माहिती भाजपा नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी दिली. विराट हिंदुस्थान संघम, मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि इस्कॉनने ‘भारतीय गायीं’वर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सुब्रह्मण्यम स्वामी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अन्य मान्यवर या परिषदेस उपस्थित होते. गोरक्षण म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्तता असल्याचे प्रतिपादन स्वामी यांनी यावेळी केले. गायीचे मांस खाणे हा इस्लामचा मूलभूत घटक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गोहत्याबंदीचा कायदा करण्यात कसलीच अडचण नाही.


गोरक्षणाच्या नावाखाली मागील काळात जो हिंसाचार झाला तो गुंडांनी घडवून आणला होता, असा दावा करतानाच गोरक्षक योग्य पद्धतीने आपले काम करीत आहेत. त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या आडून भविष्यात कोणीही रस्त्यावर हिंसाचार व अडवणूक करू शकणार नाही, असे स्वामी म्हणाले. गोहत्या बंदीसाठी सरकार लवकरच कायदा आणेल तसेच गोहत्या रोखण्यासाठी विशेष अॅपही तयार करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.