NEET- PG परीक्षा 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या संकटाची परिस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संकटाची परिस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय कर्मचार्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे NEET-PG परीक्षेला कमीत कमी 4 महिने पुढे ढकलले आहे.
PMO म्हणाले की, कोविडमध्ये आपले कर्तव्य पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्यांना शासकीय भरतींमध्ये प्राधान्य दिले जाईल. मेडिकल इंटर्न्सला त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली कोविडच्या व्यवस्थापनासाठी तयार केले जाईल.
PMO ने सांगितले की, MBBSच्या फायनल इयरच्या विद्यार्थींना माईल्ड कोविड रुग्णांच्या टेली कंसल्टेशन आणि मॉनिटरिंगचे काम दिले जाईल. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली हे काम करतील. तर BSc/GNM पात्र परिचारिकां वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोविड नर्सिंग ड्यूटीमध्ये काम करतील.
PMO च्या म्हणण्यानुसार, कोविड ड्युटीमध्ये गुंतलेले वैद्यकीय कर्मचारी त्यांचे100 दिवस काम पूर्ण करतील, तेव्हा त्यांना पंतप्रधानांच्या प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्काराने गौरविण्यात येईल.
रविवारी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॅान्फरंसींगद्वारे आरोग्य तज्ञांशी बैठक घेतली. हे सर्व निर्णय या बैठकीतच घेण्यात आले. रविवारी दुपारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पुढे ढकलले जाऊ शकते.
याशिवाय कोविड ड्युटीमध्ये एमबीबीएस आणि नर्सिंग फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना तैनात करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आज पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब झाला आहे आणि लवकरच याची नोटिस काढली जाईल.