शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या `त्या` महिला म्हणतात...
भाविकाकडून विरोध नाही, पण....
तिरुवअनंतपूरम : बुधवारी म्हणजेच २ जानेवारी रोजी दोन महिलांनी केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेश केला आणि महिलांच्या मंदिर प्रवेशाला होणाऱ्या विरोधाला वेगळंच वळण मिळालं. गुरुवारी अनेक हिंदूत्ववादी संघटनानंनी केरळ बंधचती हाक देत विरोधाचं हे सत्र सुरूच ठेवलं. पण, हा विरोध नेमका कोणाकडून होतोय, यावरुन मंदिरात प्रवेश करणाऱ्या बिंदू आणि कनकदुर्गा या दोघींनी पडदा उचलला आहे.
मंदिरात जाऊन पूजा करणं हे आपलं एकमेव उद्दिष्ट होतं आणि त्यासाठी भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध करण्यात आला नाही, हेच त्यांनी स्पष्ट केलं. 'शबरीमला मंदिरात जातेवेळी इतर सर्वच भाविकांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही मंदिरात दर्शन करुन अगदी सुखरूपपणे खाली आलो', असं एम.एस. कनकदुर्गा म्हणाल्या.
१० ते ५० या वयोगटातील, म्हणजेच मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश न करण्याची प्रथा बुधवारी ४२ वर्षीय बिंदू आणि ४४ वर्षीय कनकदुर्गा यांनी मोडीत काढली. 'शबरीमला येथे जाणं हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय होता', असं कनकदुर्गा 'मनोरमा' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
आपल्याला मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलीस यंत्रणांची मदत झाल्याचंही त्या म्हणाल्या. २४ डिसेंबरला मंदिरात प्रवेश करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतरचा त्य़ांचा हा दुसरा प्रयत्न होता, जेव्हा कनकदुर्गायांच्या साथीने त्यांनी मंदिरात प्रवेश केला. 'मंदिर प्रवेशास होणाऱ्या विरोधाना घाबरत आम्ही जर परतलो असतो, तर पुन्हा कधीच शबरीमलामध्ये येऊ शकलो नसतो. त्यामुळे आम्ही दोन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांची मदत घेतली', असं बिंदू म्हणाल्या.
बिंदू आणि कनकदुर्गा यांनी मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतल्यानंतर केरळमधील वातावरण अधिकच चिघळलं असून, यामध्ये आतापर्यंत १ हजार तीनशे एकोणसत्तर जणांना अटक केल्याचं कळत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत ८०१ खटल्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिची 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिली. सध्याच्या घडीला मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करत हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, घोषणाबाजी आणि रास्ता रोको करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणं सुरूच ठेवलं आहे.