एक महिन्याच्या तान्ह्या बाळाला सोडून गेलेली आई CCTV मध्ये कैद
गोंडस मुलीला सोडून गेली आई
मुंबई : महिला, स्त्री, मुलगी आणि अगदी तान्ह बाळ या जगात सुरक्षित नसल्याचं वेगवेगळ्या घटनांनी समोर येतं. अवघ्या एक महिन्याच्या मुलीला निष्ठुर आई अज्ञातस्थळी सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील भादरा येथील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एक महिन्याच्या तान्ह्या मुलीला एका अज्ञात स्थळी सोडून तिची आई पळून गेल्याचं सीसीटीव्हीत पाहण्यास मिळतंय. या महिलेसोबत आणखी दोन मुलं असल्याचं देखील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मुलीचा रडण्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ मुलीला शांत करत भादरा पोलीस स्थानकात माहिती दिली.
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन रूग्णालयात दाखल केलं. अज्ञातस्थळी एकटी असलेल्या या बाळाला काही त्रास तर झाला नाही ना? याची तपासणी केली जात आहे. अज्ञातस्थळी थंडीच्या दिवसांत सोडून गेलेल्या या बाळाला कुत्र्यांनी देखील भक्ष केलं असतं अशी भीती स्थानिकांकडून वर्तवली जात होती. आपल्या मुलीला अशी रस्त्यावर बेवारसपणे सोडून गेलेल्या आईचा पोलीस तपास घेत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओतून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आपल्याच मुलीला असं निर्जनस्थळी सोडून जाताना आईला काही वाटलं कसं नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. थंडीच्या दिवसांत आपल्याच बाळाला असं सोडून जाणं त्या आईला कसं जमलं? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (नाशिकमध्ये खाऊचे आमिष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार)
आज आपण भारतभर घडत असलेल्या घटनांचा आडावा घेतला तर महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. एका ठिकाणी समाजातील गिधाडं त्यांच्यावर वाईट नजर ठेवून आहेत. तर दुसऱ्या बाजूला जन्मदातीच असं सोडून जात असल्याचे प्रकार घडत आहेत.