नाशिकमध्ये खाऊचे आमिष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

 नाशिकमधील अंबड येथे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना.

Updated: Dec 9, 2019, 07:16 PM IST
नाशिकमध्ये खाऊचे आमिष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : हैद्राबाद, उन्नाव येथील अतिप्रसंग आणि बलात्काराच्या घटना ताज्या असतांना नाशिकमधील अंबड येथे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे. खाऊचे आमिष दाखवून २६ वर्षीय नराधमांने सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे.

नाशिकच्या अंबड पोलिसांनी या सैतानाला अटक केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर केलेल्या पश्चातापाचा लवलेशही नाही. कैलास कोकणी असं या नराधमाचं नाव आहे. त्यानं त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार केले. पीडित मुलीनं झालेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून १५ दिवसाच्या आत कठोर कारवाई करा अशी मागणी महिलांनी केली आहे. तातडीनं कारवाई केली तर विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये जरब बसेल असं मत नाशिककर व्यक्त करत आहेत.

विकृतांची नजर चिमुरड्यांवरही पडली आहे. त्यामुळं अशा विकृतींना ठेचून काढण्यासाठी कायदा आणखी कठोर करण्याची गरज निर्माण झाली आहे.