नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशातील कायदा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आला आहे. लॉकडाऊन तोडून पळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. तसेच परगावी चाललेल्यांची देखील कोरोना चाचणी होत असून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. दरम्यान एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. प्रियकराला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रेयसीसह तिचा संपूर्ण परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले आहे. एका भांडणामुळे हा प्रकार समोर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलीसाठी दोन मुलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना नवी दिल्लीतील गीता कॉलनीत समोर आली. लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून हे तरुण एकमेकांचा जीव घेण्यावर उठले होते. प्रेयसीच्या प्रेमापोटी ते चाकू चालवण्यापर्यंत पोहोचले. यामधील एक तरुणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला. 


जखमी तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. या चाचणीत तो कोरोना पॉझिटीव्ह निघाला. ही बातमी मिळताच प्रेयसी, तिचा परिवार तसेच ज्याने चाकू हल्ला केला त्या तरुणाला देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रशासनाची टीम तरुणीच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला.



आपल्या मुलीचा कोणीतरी प्रियकर आहे. तिच्यासाठी दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आता आपल्याला क्वारंटाईन करण्यात येतंय हे समजताच मुलीच्या घरातले हैराण झाले. पोलीसांनी दुसरीकडे हल्ला करणाऱ्याच्या घरी देखील हजेरी लावत त्याच्यासह त्याच्या घरच्यांना देखील क्वारंटाईन होण्यास सांगितले. 


जखमी तरुणाला जे ४ पोलीस कर्मचारी रुग्णालयात घेऊन गेले होते, त्यांना देखील २८ दिवसांसाठी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.


प्रेम करणारे दोघे आणि मुलगी तिघेही किशोरवयीन आहेत. प्रेयसी नक्की कोणाची यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. यातील आरोपीला त्याच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले असून हा कालावधी संपल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जखमी तरुणाला कोरोना कसा झाला ? हे अजून लक्षात आले नाही.