निर्भया प्रकरण: दोषींच्या कुटुंबियांकडून अजूनही मृतदेहासाठी दावा नाही, तर तुरुंगातच अंत्यसंस्कार
निर्भयाच्या गुन्हेगारांना एकत्र फाशी
नवी दिल्ली : निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी फाशी देण्यात आली. चार ही गुन्हेगारांच्या मृतदेहांना शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. तिहाड कारागृह प्रशासनाने चारही गुन्हेगारांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विचारणा केली आहे. पण अजून पर्यंत कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आलेले नाही.
जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्यात येतील. ज्या जेल क्रमांक ३ मध्ये ही फाशी देण्यात आली त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कपडे आणि सामान कुटुंबियांना सोपणार
फासावर लटकवण्याआधी चार ही आरोपींना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली. पण चौघांनी ही कोणतीच इच्छा जाहीर केली नाही. त्यामुळे तिहाड कारागृह प्रशासन दोषींनी कमवलेले पैसे त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे. सोबतच त्यांचं सामान आणि कपडे देखील कुटुंबियांना सोपणार आहेत.
तिहाड जेल प्रशासनाने आज पहाटे निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकवलं. विनय, अक्षय, मुकेश आणि पवन गुप्ता अशी या दोषींची नावे आहेत. चार ही गुन्हेगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहेत.
७ वर्ष, ३ महिने आणि ३ दिवसानंतर निर्भयाला न्याय
१६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचार ही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लोकं हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरली. पण अखेर ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.
निर्भयाची आई आशी देवी यांनी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढली. आज निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर आई आशा देवी यांनी २० मार्च हा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा करेल अशी घोषणा केली. आता देशातील दुसऱ्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढेल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.