नवी दिल्ली: देशाच्या आर्थिक क्षेत्रासमोर अभूतपूर्व असे संकट उभे राहिले आहे. यामधून बाहेर पडायचे असल्यास काहीतरी विलक्षण उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या Mindmine summit 2019 मध्ये बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अरिष्ट ओढावल्याची कबुली दिली. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारसाठी ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत कधीही अशाप्रकारचा तरलतेची (लिक्विडिटी) समस्या उभी ठाकली नव्हती. संपूर्ण आर्थिक क्षेत्रच कचाट्यात सापडले असून कोणीही एकमेकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. 


खासगी क्षेत्रातही कोणीही इतरांना कर्जे द्यायला तयार नाही. प्रत्येकजण स्वत:जवळ रोकड सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत गेल्या ७० वर्षांमध्ये निर्माण झाली नव्हती, अशी तरलतेची (लिक्विडिटी) समस्या उभी ठाकल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांत भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याचा इशारा अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. देशातील वाहन उद्योग सर्वाधिक अडचणीत असल्याचे सांगितले जाते. अनेक कंपन्यांनी मागणीअभावी त्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट केली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प बंद पडले असून हजारो कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. 


थोड्याफार फरकाने इतर क्षेत्रांमध्येही हीच स्थिती आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.