नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, अशी कबुलीच काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी दिली आहे. काँग्रेसला बहुमत मिळालं नाही, तरी यूपीए आघाडी पुढचं सरकार स्थापन करेल, असं भाकीत सिब्बल यांनी केलं आहे. काँग्रेसला बहुमतासाठीच्या २७२ जागा मिळवण्याचा विश्वास असता, तर त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं असतं, असं सिब्बल यांनी सांगितलं. पण पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावर मात्र सिब्बल यांनी उत्तर देणं टाळलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान कोण होणार, याबाबत निकाल आल्यानंतर घोषणा केली जाईल, असं सिब्बल म्हणाले. काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे का केलं जात नाही? असा प्रश्न सिब्बल यांना विचारण्यात आला. 'जर काँग्रेसला २७२ जागा मिळाल्या असत्या तर काहीच अडचण नव्हती. आम्ही राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं असतं. पण पक्षाला बहुमत मिळालं तर राहुल गांधी पंतप्रधान असतील', असं उत्तर कपील सिब्बल यांनी दिलं.


'बहुमत मिळालं तर राहुल गांधी पंतप्रधान होतील, पण बहुमत मिळणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला २७२ जागा मिळणार नाहीत, हे आम्हालाही कळतंय. काँग्रेसला बहुमत मिळेल असं सांगायला मी मूर्ख नाही. पण भाजपलाही १६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत,' असं भविष्य सिब्बल यांनी वर्तवलं.


'काँग्रेसप्रणीत यूपीएला निवडणुकीत आघाडी मिळेल. पण आम्हाला उत्तर प्रदेशातल्या महागठबंधनविरुद्धही लढावं लागणार आहे. २३ मे म्हणजेच निकाल लागल्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल. याबाबत गठबंधन निर्णय घेईल. आमच्या पक्षाचा नेता निर्विवाद आहे. आमचं गठबंधन एकजूट आहे,' असं सिब्बल यांनी सांगितलं.