पणजी : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकार नागरिकांना सतत नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहे. पण काही जण असे ही आहेत जे अजूनही मास्क न लावताच वावरत असतात. अशा स्थितीत गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जर कोणी मास्क घातला नसेल तर त्याला पेट्रोल आणि राशन नाही दिलं जाणार. गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसईसीने निर्णय घेतला आहे की, कोरोनोचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणं आवश्यक आहे. याची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही पेट्रोल पंपवर जर व्यक्ती बिना मास्क पेट्रोल घ्यायला आला तर त्याला पेट्रोल दिलं जाणार आहे. तसेच राशनच्या बाबतीत ही हा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्यामुळे गोव्याला आता ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलं की, आमच्या कोरोना योद्धा आणि गोव्यातील लोकांच्या प्रयत्नांमुळे राज्य ग्रीन झोनमध्ये आलं आहे. गोव्यात कोरोनाचे ७ रुग्ण आढळली होती. पण सर्व रुग्ण बरे झाल्यामुळे आता येथे कोणताही पॉझिटीव्ह रुग्ण नाही.


देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३५ हजार ४३ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १८२३ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ११४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गेल्या २४ तासांत ६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८८८९ लोक बरे झाले आहेत.