`चेकबुक`बंदीचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं
नोटबंदीनंतर चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. याच संदर्भात आता अर्थ मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चेकबुक बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने एक ट्विटही केलं आहे.
चेकबुक बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाहीये आणि विचारही नाहीये असं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून चेकबुक बंद करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचं आणि गोंधळाच वातावरणं निर्माण झालं होतं. त्यामुळे या संदर्भात अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
"ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार चेकबुक बंद करणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, हे वृत्त निराधार असून तसा कुठलाही प्रस्ताव नाहीये" असं अर्थमंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अखिल भारतील व्यापारी महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळे डेबिट-क्रेडीट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्यास नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या सरकार नोटांच्या छपाईसाठी २५००० कोटी रुपये खर्च करतं आणि त्याच नोटांच्या सुरक्षेसाठी ६००० कोटी खर्च करतं.