नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (COVID-19) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गुरुवारी सर्व राज्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांना घरातून बाहेर पडू न देण्याच्या कठोर नियमांची अंमलबजावणी होईल. या नियमातून केवळ लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि डॉक्टरांना वगळण्यात आले आहे. तसेच २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. एका आठवड्यासाठी ही बंदी लागू असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा'


काहीवेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत मंत्रिगटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर आता रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्याकडून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, देशातील कोरोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहोचली आहे. गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला. यापूर्वी दिल्ली, कर्नाटक आणि मुंबईत प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे बळी गेला होता. देशात आत्तापर्यंत करोनाबाधित १७२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जगभरात आतापर्यंत ९००० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ इराण आणि इटली या देशांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. कोरोना विषाणूचा सामना करणे हे एकप्रकारचे युद्ध आहे. युद्धाचा भोंगा वाजला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध होऊन सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.