अमेठी  : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा गड असणाऱ्या अमेठीमध्ये एकही चित्रपटगृह नसल्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट अमेठीतील नागरिकांनाही पाहता यावा, यासाठी त्यांनी मोबाईल डिजिटल चित्रपगृहांची व्यवस्था केली असून त्यावर 'उरी..' विनामुल्य प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत चित्रपट रसिकांना एक अनोखी भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याच्या घडीला दिवसातून एकूण चार वेळा 'स्पाईस फॅक्टरी' येथे हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. २०१४ मध्ये खुद्द इराणी अमेठीतून निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे एका चित्रपटासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल बऱ्याच चर्चांनाही तोंड फोडत आहे. 


प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अमेठीत पहिल्यांदाच 'उरी' प्रदर्शित झाला. ज्याच्या सुरुवातीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इराणी यांनीही चित्रपट रसिकांशी संवाद साधल्याचं कळत आहे. इतकच नव्हे तर, अमेठीमध्ये चित्रपटाच्या पोस्टरवरही इराणींचं छायाचित्र पाहायला मिळत आहे. 



'पिक्चर टाईम' या कंपनीकडून अमेठीत उरी प्रदर्शित करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. या साऱ्यात समन्वयक म्हणून काम पाहण्याऱ्या भाजपच्या युवा फळीचे सचिव विष्णू मिश्रा यांनीही याविषयीची अधिक माहिती दिली. 'अमेठीमध्ये सध्या एकही चित्रपटगृह सुरू नाही. पण, तरीही येथील जनतेकडून उरीचं प्रदर्शन होण्यासंबंधीची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे स्मृती इराणी स्वत: पुढे येत हे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी चित्रपट रसिकांशी संवादही साधला', असं ते म्हणाले. 



अमेठीमध्ये सुरू असणाऱ्या या मोबाईल थिएटरमध्ये एकूण १५० प्रेक्षक एका वेळेस मावू शकतात. ज्यामध्ये दिवसातून चार वेळा चित्रपटाचं स्क्रीनिंग शक्य आहे. ज्यामध्ये सकाळी ९.२०, दुपारी १.३०, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजता 'उरी...' प्रदर्शित करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २००० प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्याची माहिती पक्ष कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे.